अकोला पोलीस विभागात ‘रक्षकच बनले भक्षक ‘चा प्रत्यय ; सहकाऱ्याच्या पत्नीवर पोलिसाचा बलात्कार
अकोला / नवप्रहार वृत्तसेवा
अकोला पोलीस विभागात घडलेल्या एका घटनेने खळबळ माजली आहे. येथे एका शिपायाने आपल्याच मित्राच्या पत्नीवर वारंवार बलात्कार केला आहे. तो महिलेला ब्लॅकमेल करीत असल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे. शिवम दुबे असे त्याचे नाव असून गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. शिवम एलसीबी मध्ये कार्यरत असल्याचे समजत आहे.
अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात मागील वर्षी शिवम दुबे हा कार्यरत होता, यादरम्यान त्याची सोबतच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांशी चांगली मैत्री झाली. यातूनच शिवमचं ‘त्या’ मित्र झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. याचदरम्यान त्याची वाईट नजर मित्राच्या पत्नीवर पडली. शिवमनं आपल्या या मित्राच्या पत्नीला ‘फेसबुक’वर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली. तिने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं.
त्यानंतर शिवम आणि तिच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. यातच शिवमने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतरानं शिवमनं मित्राच्या पत्नीला म्हणजेच पीडित महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. तिने मोठ्या हिमतीने हा प्रकार पतीला सांगितला आणि लागलीच आकोट शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून शिवमवर आकोट शहर पोलीस ठाण्यात 526/2023 कलम 354, 354 (अ), 354 (ड), 376(1) (ए), 376(2) (एन), 376 (3) या कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक योगिता ठाकरे करीत आहेत.
पीडितेवर अकोला-अमरावतीत येथे बळजबरी – तक्रारीत सर्व घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. शिवमनं पीड़ित महिलेसोबत फेसबुकदवारे मैत्री संपादन करून प्रेमसंबंध केले. त्यातून शारिरीक संबंध ठेवून भाबडेपणाचा फायदा घेत ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने दोन ते तीनदा शारिरीक संबंध केले अशा तक्रारीवरुन सदरचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान शिवमनं पंडित विवाहित महिलेवर तिच्या राहत्या घरी तसेच अमरावती येथे नेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे. तसेच रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत देखील पीडित महिलेवर शिवमनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते. दरम्यान अकोट पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवम हा फरार झाला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
अद्याप आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाहीय. आरोपी पोलीस खात्यात असल्याने पोलीस दलाचे बदनामी होत असल्याने पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगलं आहे. या प्रकरणाची अकोल्याच्या पोलीस दलात मोठी चर्चा असून यावरून मोठी खळबळ उडाली आहे.