नल दमयंती सागरावर विदेशी पक्षाचा मुक्त संचार ,विविध प्रजातीचे स्थलांतरित पक्षी अप्पर वर्धा जलाशयावर दाखल अप्पर वर्धा जलाशयावर १५१ प्रजातीच्या पक्षांच्या नोंदी”

मोर्शी(तालुका प्रतिनिधी)दि.१४/१२
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अशा अप्पर वर्धा जलाशयावर दरवर्षी हिवाळ्यामध्ये विविध प्रजातीचे परदेशी पक्षी हजारो कि. मी.वरून स्थलांतर करून येतात. हे स्थलांतर करत असताना पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. हे पक्षी उत्तर गोलार्धामधून स्थलांतर करून भारतामध्ये येतात.प्रामुख्याने हे हिवाळ्यातील स्थलांतर हवामानातील बदल आणि मुबलक अन्नासाठी केल्या जाते. भारतामध्ये येणारे स्थलांतरित पक्षी मंगोलिया, सायबेरिया, रशिया , उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान तसेच युरोपातील देशामधून या जलाशयावर स्थलांतर करतात. या पक्षांमध्ये प्रामुख्याने राजहंस, कलहंस, चक्रवाक, तलवार बदक, थापट्या बदक, तरंग बदक, भुवई बदक तसेच युरोपातील काही देशांमधून काळा करकोचा, कुरव, सुरय,मोर शराटी भारतामध्ये येतात. राजहंस व कलहंस हे पक्षी मंगोलियातून सुमारे 3000 ते 4000 किलोमीटरचे प्रवास करून महाराष्ट्र मध्ये दाखल होतात. राजहंस पक्षी हिमालयाच्या उंच शिखरावरून म्हणजेच 21460 फुटावरून भरारी घेऊन भारतामध्ये दाखल होतात. विशेष म्हणजे या जलाशयावर विणीच्या हंगामात ऑस्ट्रेलियातून प्राच्य आर्ली, छोटा आर्ली तसेच दक्षिण भारतातील काही भागातून निळ्या शेपटीचा राघू मोठ्या संख्येने विण करण्यासाठी जलाशयातील परिसरामध्ये दरवर्षी येतात. तसेच पश्चिमेकडील समुद्रपक्षी त्यामध्ये पानचिरा, सुरय पक्षाच्या अनेक प्रजाती,कुरव पूर्वेकडील समुद्र भागामध्ये जात असताना महत्त्वाचा थांबा म्हणून या जलाशयाचा वापर करतात. विशेष म्हणजे सायबेरियातून अनेक प्रकारचे चिखल पक्षी, तसेच काळ्या शेपटीचा पाणटीवळा, पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून भारतामध्ये दाखल होतात. या संदर्भातील संशोधन प्रा.अश्विन लुंगे, श्री.आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालय मोर्शी तसेच प्रा.डॉ. गजानन वाघ, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांनी केलेल असून नुकताच 151 प्रजातींच्या पक्षाच्या नोंदी घेतलेला शोध निबंध “बायोलॉजिकल रिसर्च कम्युनिकेशन” या जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे . विशेष म्हणजे पांढऱ्या माथ्याचा कलहंस या पक्षाची नोंद प्रथमच या जलाशयावर घेण्यात आली आहे. आय.यु.सी. एन. रेड लिस्ट नुसार संकटग्रस्त असलेले एकूण नऊ पक्षी-प्रजाती या जलाशयावर आढळून येतात.अप्पर वर्धा जलाशय स्थलांतरित व स्थानिक पक्षांच्या अधिवासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे.