युवक बाईक वर धडावेगळ शीर घेऊन फिरत असल्याने गावात माजली खळबळ
शंकर प्रल्हाद जाधव आणि आरोपींमध्ये शेतीच्या कारणावरुन सतत वाद होत होते. दोन वर्षापूर्वी यासंदर्भात माढा न्यायालयात याप्रकरणी दावा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी शंकर उर्फ बिटू प्रल्हाद जाधव यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केल्यानं ते घरामध्ये झोपले होते.
यावेळी शिवाजी जाधव, परमेश्वर जाधव, अजित जाधव, आकाश जाधव हे त्यांच्या घरी आले. यावेळी शंकर जाधव यांना परमेश्वर जाधव, अजित जाधव व आकाश जाधव यांनी पकडलं आणि शिवाजी जाधव यानं त्याच्या हातातील कुऱ्हाडीनं शंकर जाधव यांच्यावर वार केले. तसेच आपल्या सख्या चुलत्याचं शीर धडावेगळं करुन ते बरोबर घेऊन तो बाईकवरुन गावातून फिरत होता, इतर इतर सर्व आरोपी फरार झाले
या हत्याकांडातील आरोपी शिवाजी जाधव हा स्वतः मंगळवारी अकलुज पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानंतर ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलीसांनी रात्री अटक केली. यातील हत्या करण्यात आलेली व्यक्ती शंकर जाधव (वय 65, रा. कुरणवस्ती शेवरे, ता.माढा, जि. सोलापूर ) यांचं धडावेगळं केलेले शीर सोमवारी सायंकाळी पोलिसांना आढळून आलं, त्यानंतर मंगळवारी शवविच्छेदन होऊन दुपारी शेवरे इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मृत शंकर जाधव यांचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर (रा. शेवरे ता.माढा) यानं फिर्याद दिली होती. यात शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव (रा. कुरणवस्ती शेवरे ता.माढा) यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर टेंभुर्णी आणि अकलुज पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांचे संयुक्त पथकं तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.
तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची आरोपींना शोधण्यासाठी मदत घेण्यात आली. दरम्यान, सायंकाळी शंकर जाधव यांचं धडावेगळं केलेलं शीर आणि आरोपीनं वापरलेली मोटारसायकल महाळुंग इथल्या शेतात आढळून आली.