असेही गाव जेथे केल्या जाते सापांची शेती
‘ साप ‘ हा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारे उभे राहतात. साप बाजूने गेला तरी मनात धडकी भरते. अश्या या प्राण्याची एखाद्या गावात शेती केल्या जाते असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं होत.चला तर जाणून घेऊ या कुठे होते सापाची शेती.
चीनमध्ये असणाऱ्या जिसिकियाओ या गावात किंग कोब्रा, वायपर, रॅटल स्नेक अशा विषारी सापांची शेती केली जाते. येथे दरवर्षी तीस लाखांहून अधिक साप येथे जन्माला येतात. चीनच्या या गावात सापांच्या अनेक प्रजाती पाळल्या जातात. लाकूड आणि काचेच्या छोट्या खोक्यात हे साप पाळले जातात. गावात सुमारे 170 कुटुंबे आहेत, जे दरवर्षी 30 लाखांहून अधिक सापांचे उत्पादन करतात.
यामागील कारण वेगळे आहे. खरं तर, चीनमध्ये हजारो वर्षांपासून पारंपारिक औषधांना खूप महत्त्व दिले जात आहे, येथे अनेक प्रकारच्या सापांपासून औषधे तयार केली जातात. या औषधांचा उपयोग त्वचेच्या रोगांवर व कर्करोगाच्या उपचारासाठी देखील केला जातो. तसेच सापाचे विष हृदयरोग्यांना दिले जाते, सापापासून तयार केलेल्या औषधावर अल्कोहोलचा प्रभाव पडत नाही. त्याचबरोबर हे औषध जो माणूस कायम पितो तो नेहमी निरोगी राहतो. 1918 च्या स्पॅनिश फ्लूवर चीनमध्ये सापाच्या तेलाने उपचार केले होते.
चीनमध्ये सापाचे मांस अतिशय आवडीने खाल्ले जाते. तर अनेक प्रजातींचे साप पिशव्या, शूज आणि बेल्ट बनवण्यासाठी वापरतात. यातून येथील नागरिकांना लाखोंचा फायदा होतो. या अनोख्या शेतीमुळे हे गाव चर्चेचा विषय बनले आहे. तसेच या गावात झुरळे आणि मच्छरांचेही उत्पादन घेतले जाते.
एका रिपोर्टनुसार, व्हिएतनामच्या एका गावात सापांची बागही आहे. येथे झाडांच्या फांद्यांवर साप लटकलेले पहायला मिळतात. या बागेचे नाव डोंग टॅम स्नेक फार्म आहे, ज्या पद्धतीने शेतात फळे आणि भाजीपाला पिकवला जातो, त्याच पद्धतीने येथे साप पाळले जातात. त्यांचा वापर चीनमधील सापांप्रमाणेच केला जातो आणि त्यांच्यापासून औषधे बनवली जातात.