कुशाग्र ची हत्या पैश्याच्या मोहातून ; आरोपींनी सांगितला घटनाक्रम

कानपूर / नवप्रहार मीडिया
कुशाग्र कनेडिया या विद्यार्थ्यांची हत्या पैश्याच्या मोहातून करण्यात आल्याची आणि हत्याकांड कसे घडवून आणले याबाबत आरोपी कडून माहिती काढण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात कोचिंग क्लासची शिक्षिका, तिची बॉयफ्रेंड आणि मृत मुलाच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खंडणीचे नाट्य रचले गेले, पण पोलीस तपासातून नेमक्या गोष्टी स्पष्ट होत गेल्या. आता पोलिसांना कोचिंग क्लासची शिक्षिका रचिता वत्स, तिचा बॉयफ्रेंड प्रभात यांच्या चौकशीतून नवीन माहिती समजली आहे. हत्या नेमकी कशी गेली हे देखील निष्पन्न झाले आहे.
कानपूरमधल्या इयत्ता 10 वीत शिकणाऱ्या कुशाग्रची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. कुशाग्र हा प्रसिद्ध उद्योगपती संजय कनोडिया यांचा मुलगा आहे. या प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांना नवीन माहिती समजली आहे. प्रकरणातला मुख्य आरोपी प्रभात शुक्लाने कुशाग्रची हत्या करण्याच्या इराद्याने घटनेपूर्वी तीन ते चार दिवस आधीच दोरी खरेदी करून ठेवली होती. तो कुशाग्रच्या जाण्या-येण्याच्या मार्गाची रेकी करत होता. प्रभात हे कृत्य कुशाग्रची कोचिंग क्लासची शिक्षिका रचिता वत्स हिच्या सांगण्यावरून करत होता. कुशाग्र श्रीमंत घरातला मुलगा असल्याने चांगली खंडणी मिळेल अशी आशा रचिताला होती, असं बोललं जात आहे,
दुसरीकडे, ज्या ठिकाणी कुशाग्रची हत्या झाली त्या ठिकाणी एक कंपाउंड असून जवळपास अनेक घरं आहेत. पण कोणालाही या कृत्याचा मागमूस लागला नाही, हे पाहून पोलीस देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. कुशाग्रची इतक्या सफाईने हत्या करण्यात आली की त्याचा ओरडण्याचा आवाज कोणी ऐकला नाही. कुशाग्रचा दोरीने गळा दाबून खून करण्यात आला. त्याचे हातपाय बांधल्याचे पोलिसांना आढळले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत शेजाऱ्यांनाही त्यांच्या शेजारी कोणाची तरी हत्या झाल्याची कल्पना नव्हती. घटनेच्या दिवशी प्रभात प्लॅननुसार कुशाग्रच्या वाटेत थांबला होता. संध्याकाळी तो कोचिंगसाठी स्कूटीवरुन निघेल हे प्रभातला माहिती होते. त्याने रस्त्यात कुशाग्रला थांबवले आणि वाहन नसल्याचे कारण देत घरी सोडण्यास सांगितले. त्यानंतर त्याने घटनास्थळी नेत कुशाग्रची हत्या केली.
पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार, आरोपी सरळ सरळ कुशाग्रची हत्या करु इच्छित होते. पोलिसांच्या पंचनाम्यात मृतदेहाच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. पण पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की हत्येनंतर मृतदेह फरपटत नेल्याने या जखमा झाल्या.
काही दिवसांपूर्वी या हत्याकांडातल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रभात आणि त्याचा मित्र शिवाला नाराज वकिलांनी मारहाण केली. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नातून आरोपींना बाहेर काढले. रचिताला मंगळवारी सायंकाळी एमएम-3 न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान, प्रभात आणि त्याचा मित्र शिवा कुशाग्रच्या घरी स्कुटीवरुन खंडणी मागणारे पत्र फेकण्यास गेले तेव्हा त्यांनी गाडीचा नंबर बदलला होता. त्यांनी स्कूटीच्या नंबरमध्ये एफ ऐवजी ई लिहिले. ही स्कूटी रचिताची होती. कुशाग्रच्या घराबाहेरील गार्डने गाडी ओळखली. कुशाग्रच्या कुटुंबीयांनी रचिताशी संपर्क साधला तेव्हा ती अज्ञात असल्याचे भासवत दिशाभूल करत होती. कुशाग्रच्या हत्येनंतर रचिताने त्याच्या मामाला कॉल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशाग्रच्या मामाला तिने तो बेपत्ता झाल्याने चिंता व्यक्त केली. तसेच ती सातत्याने प्रकरणाची माहिती घेत होती. पोलिसांना तिच्यावर संशय येऊ नये म्हणून ती असे करत होती. पण तिने कुशाग्रचा मृतदेह रुममध्ये लपवून ठेवला होता.
जॉईंट कमिशनर आनंद प्रकाश तिवारी यांनी याप्रकरणी सांगितले की, ‘या प्रकरणाची सुनावणी द्रुतगती न्यायालयात व्हावी, अशी मागणी पोलीस करतील. तसेच 10 ते 15 दिवसांत या संपूर्ण प्रकरणाची चार्जशीट न्यायालयात दाखल करतील.’
या घटनेमुळे कुशाग्रचे कुटुंब शोकाकूल आहे. ‘मी कोचिंग शिक्षिका रचिता वत्सला कधीही ओळखू शकलो नाही. मी तिला ओळखले असते तर कदाचित आज कुशाग्र जिवंत असता,’ असे कुशाग्रचे वडील संजय कनोडियांनी सांगितले.