गुटख्यासह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओमिरखेलकरांच्या ‘टिप्स’मुळे भंडाफोड
नेर बायपासवर गुटखा तस्करीचा पर्दाफाश
नेर :- नवनाथ दरोई
गुटखा व सुगंधीत पानमसाला, तंबाखुच्या हेराफेरीत जिल्ह्यात सध्या आर्णी डंक्यावर आहे. त्यातूनच आर्णीतील दोघांनी अमरावतीतून वाहनाद्वारे आणलेला प्रतिबंधीत गुटख्यासह लाखोंचा पानमसाला नेर पोलिसांनी जप्त केला. जवळपास सात लाखांच्या गुटख्यासह पाच लाखांचे वाहन असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २८ ऑक्टोबरला नेर बायपासवर करण्यात आली.
सय्यद जहागीर सय्यद गुलाम रसुल (६२)रा. मुबारकनगर आर्णी असे घेतलेल्या वाहनचालकाचे तर शेख कादर शेख छोटू (२४) रा. अंतरगाव ह.मु. अमराई ता. आर्णी असे क्लिनरचे नाव आहे. २८ ऑक्टोबरला रात्री दारव्ह्याचे एसडीपीओ तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना त्यांच्या गुप्तचाराकडून या गुटखा तस्करीची
माहिती मिळाली होती. प्रतिबंधीत सुगंधीत पानमसाल्यासह गुटखा व तंबाखूची एका बोलोरो पिकअप वाहनातून वाहतूक होत असल्याचे सांगितले होते. सदर वाहन अमरावती येथून नेर शहरात पोहोचत असल्याची माहिती मिळताच मिरखेलकर यांनी नेर पोलिसांना अलर्ट केले होते. त्यावरून नेरचे ठाणेदार बाळासाहेब नाईक, पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार, दिपक बदरके, सहाय्यक फौजदार नरेंद लावरे, अनिस सय्यद, शिपाई योगेश शेळके व दोन पंच अशा पथकाने बायपासवर जाऊन सापळा रचला. दरम्यान त्यांना एमएच २९ टी ६२७९ या क्रमांकाचे वाहन येतांना दिसले. सदर वाहनाला थांबविले असता पथकाने झडती घेतली. चालकाचे नाव विचारले असता त्याने सय्यद जहागीर तर क्लिनरने शेख कादर असे नाव सांगितले. वाहनाच्या झाडाझडतीत पोलिसांना पांढऱ्या रंगाचे सात पोते ज्यामध्ये सुगंधीत विमल पानमसाला प्रत्येक पोत्यामध्ये चार पिशव्या आढळल्या. एका पिशवीत ६५ नग पानमसाला
आढळला. एका नगाची किमत १५० रुपये याप्रमाणे ६५ नगाचे ९ हजार ७५० रुपये अशा एका पिशवीची किंमत तर चार पिशवीची किंमत ३९ हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले. ऐकूण सात पोत्यात २ लाख ७३ हजाराचा पानमसाला आढळला. पांढऱ्या रंगाच्या नऊ पोत्यांमध्ये इगल गुटखा, शिखा तंबाखू, एका पोत्यामध्ये सहा पिशव्या आढळल्या. एका पिशवीत ११ इगल तंबाखुचे नग दिसून आले. एका नगाची किंमत ६४० रुपये याप्रमाणे एका पिशवीत ७
हजार ४० रूपये याप्रमाणे सहा पिशव्यात ४२ हजार २४० रुपयाचा याप्रमाणे नऊ पोत्याची किंमत ३ लाख ८० हजार १६० रुपये असल्याचे स्पष्ट झाले. एकंदरीत लाल रंगाच्या मोठ्या कट्यासह त्याहून मोठ्या एका कट्यामध्ये चार छोट्या पिशव्या होत्या. प्रत्येक पिशवीमध्ये ६५ नग याप्रमाणे प्रत्येक नगाची किंमत ३० रुपये असे एका पिशवीची किंमत १ हजार ९५० रुपये असल्याचे पुढे आले. एका लाल कट्यामधील चार पिशवीची किंमत ७ हजार ८०० रुपये
असे ऐकून ७ लाल मोठ्या कट्यातील मालाची किंमत ५४ हजार ६०० रुपये त्याचबरोबर वाहनाची किंमत पाच लाख असा ऐकून सात लाख सात हजार ७०८ रुपयाचा गुटखा मिळून १२ लाख ७ हजार ७०८ रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील कारवाईसाठी यवतमाळच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारन केले आहे. यामध्ये लवकरच गुन्हा दाखल होणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा एसडीपीओ आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरचे ठाणेदार बाळासाहेब नाईक, पोउनि किशोर खंडार, दिपक बदरके, फौ. नरेंद्र लावरे, अनिस सय्यद, योगेश शेळके, सतिष बहादुरे, निलेश सिरसाठ, योगेश सलामे, पवन ढवळे यांनी केली.
गुटखा तस्करीचे जिल्ह्यात नेटवर्क
■ एकिकडे जिल्ह्यात पोलिसांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी मोहिम उघडली आहे. मात्र, गुटखा तस्करीचे मोठे नेटवर्क जिल्ह्यात अद्यापही अभेद्य आहे. आर्णी, बाभुळगाव, दारव्हा आदी तालुक्यात काही घरभेदी पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने गुटख्याची तस्करी केली जाते. गुटख्याची हेराफेरी कोण करतो, गुटखा येतोय कुठून या सर्व बाबीची माहितीही पोलीस दलातील अनेक प्रस्थापितांना आहे. चुटपूट कारवाया करून धन्यता मानन्याचा प्रकारही घडतो आहे.