संविधानाला धोका निर्माण झाल्यास आंबेडकरी समाज पेटून उठेल – ॲड.गोस्वामी
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पवनी तालुक्यातील मौजा सोमनाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड.महेंद्र गोस्वामी हे होते.तर उद्घाटक म्हणून भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरजी जिभकाटे होते.तर प्रमुख उपस्थितीत सरपंच ममता गिरडकर, शैलेश मयूर, ॲड. योगीराज सुखदेवे, उपसरपंच आकाश रामटेके, तंटामुक्ती अध्यक्ष देवानंद बोरकर, सदस्य रवी जांभूळकर,रजनी मेश्राम,रसिका गजभिये, मनोरमा वैद्य,दूर्गा डाकोरे, तुकडू रामटेके, डॉ सतरंज गजभिये, काशीराम हुमणे, मोरेश्वर भुरे हे हजर होते.
या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व उद्घाटक यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी गंगाधर जिभकाटे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले व बेरोजगारीचा प्रश्न मांडला.
तर अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी समता, बंधुता,न्याय, स्वातंत्र्य व धर्मनिरपेक्षता या पंचसूत्रीवर देशाची लोकशाही टिकून असून नागरिकांचे मुलभूत अधिकार व हक्काचे हनन होता कामा नये.तसेच कोणतेही सरकार संविधानाच्या मुळ तत्वात बदल करू शकत नाही, असे स्पष्ट केले. मात्र कुणीही संविधानाच्या मुळ गाभ्याला हात लावल्यास आंबेडकरी समाज पेटून उठेल,असा इशारा दिला.
दोन दिवसीय धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने युवा कव्वाल आकाशराजा गोसावी यांच्या दमदार भिमगितांचा नजराणा पेश करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास रामटेके यांनी केले.तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आकाश रामटेके यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष प्रदीप बोरकर,मनोज उके, नरेंद्र गोस्वामी, मुन्ना गोस्वामी, अंबादास बोरकर,रतन गोस्वामी,रंजन मेश्राम,रूस्तम रामटेके, आशीर्वाद गजभिये, विवेकानंद जांभूळकर यांनी अथक परिश्रम घेतले.