जिल्ह्यातील उपकेंद्र सक्षमीकरणाची कामे तातडीने पूर्ण करा.
– महावितरण संचालक (संचालन) संजय ताकसांडे
अरविंद वानखडे
यवतमाळ – १७ ऑक्टोबर २०२३; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मध्ये निवडण्यात आलेल्या बाभुळगाव तालुक्यातील ३३ केव्ही घारफळ उपकेंद्रास महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी भेट दिली आणि उपकेंद्रात सुरू असलेल्या उपकेंद्राच्या सक्षमीकरणाच्या कामाची पाहणी केली. घारफळ सह जिल्ह्यात आणखी ४८ उपकेंद्राच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात येणार्या सौर ऊर्जा प्रकल्प या उपकेंद्राला जोडण्यात येणार असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य होणार असल्याने उपकेंद्रात सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील इतर उपकेंद्रांबरोबरच घारफळ उपकेंद्राची निवड करण्यात आलेली आहे. त्यासाठी घारफळ ग्रामपंचायतीअंतर्गत शासनाने १२.३५ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर जवळपास २.५ मेगावॅट वीज निर्मिती होणार असून संबंधित सौर कृषी वाहिनी तयार झाल्यानंतर घारफळ उपकेंद्रांतर्गत १२ गावांतील सुमारे ८०२ कृषिपंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यातील ४९ उपकेंद्रांचा समावेश करण्यात आलेला आहे.
संचालक (संचालन)संजय ताकसांडे यांनी घारफळ उपकेंद्रास भेट देऊन उपकेंद्राची पाहणी केली. सौर प्रकल्प जोडणीसाठी आवश्यक विविध प्रकारची देखभाल-दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करण्यासह अनेक उपयुक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. संचालक (संचालन) यांच्या या ग्रामीण भागातील घारफळ उपकेंद्राच्या भेटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढला.
यावेळी अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी,यवतमाळ मंडलाचे अधीक्षक अभियंता (प्रभारी) संजय खंगार, यवतमाळ विभागाचे कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम चव्हाण, अतीरिक्त कार्यकारी अभियंता विनोद माळवी, उपकार्यकारी अभियंता विरेंद्र काळबांडे,भारत अंजनकर यांच्यासह घारफळ शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.