खाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात समता सैनिक दलाचा एल्गार
लाखनी येथील तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा
लाखनी – देशातील केंद्र व महाराष्ट्रातील राज्य सरकारने खाजगीकरण व कंत्राटीकरणाचा सपाटा चालू ठेवला आहे. देशातील सार्वजनिक संस्था व कंपन्यांचे खाजगीकरण करून गोरगरीब जनतेला सोयी-सुवीधांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सदयस्थितीत सुरू आहे. शासनाने सरकारी शाळा बंद करण्याचा संविधानविरोधी निर्णय घेवून राज्यातील ६२००० शाळा बंद केलेल्या आहेत.
राज्यशासनाने ६ सप्टेंबर २०२३ रोजी काढण्यात आलेल्या कंत्राटी पदभरती संदर्भातील निर्णय रद्द करावा. सरकारी विभागातील रिक्त पदे त्वरीत भरावीत. ५५ हजार शिक्षकांची पदभरती एकाच टप्प्यात करावी. राज्यातील पदभरती प्रक्रीया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जावी तसेच सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण थांबविण्यात यावे इ. मागणीसह लाखनी तालुक्यातील समता सैनिक दल संघटनेने महाप्रज्ञा बुद्ध विहार इथून सुरूवात करून सिंधी लाईन चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत पथसंचलन केले व लाखनी तहसिलदार यांना निवेदन सादर केले.
यावेळी लाखनी व तालुक्याच्या आसपासच्या गावातील बहुसंख्य समता सैनिक या पथसंचालनात सहभागी होते. विशेषतः महीला सैनिक मोठया संख्येने मोर्च्यात सहभागी होते.
समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कमांडर गजेंद्र गजभीये यांनी जनआक्रोश मोर्चा चे नेतृत्व केले. यावेळी आंबेडकरी विचारवंत व साहित्यिक प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी महामोर्च्याला संबोधीत केले. याप्रसंगी महाप्रज्ञा विहाराचे अध्यक्ष सुरेंद्र बन्सोड , नामदेव काणेकर , वर्षा तिरपुडे , शर्मिला खंडारे , रोशन खोब्रागडे , मुर्तिकार वाहने व महीला समता सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.