चांद्रयान 3 चा टेक्निशियन विकतो आहे इडली सांभार
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
भारताने चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग करून जगभरात आपला डंका वाजवला आहे. इस्रो आणि मोदींजींवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या मोहिनेत शास्त्रज्ञा सोबत त्यांना मदत करणाऱ्या इतर लोकांचा आणि टेक्निशियन चा फार मोठा वाटा आहे.पण या मोहिमेत टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर इडली सांभार विकायची वेळ आली आहे. 18 महिन्यांपासून त्याला पगार न मिळाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मुख्य म्हणजे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बायकोचे दागिने देखील गहाण ठेवले आहेत.
बीबीसीच्या वृत्तानुसार, चांद्रयान-३ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे रांचीचे रहिवासी दीपक कुमार उपरारिया यांना आज रस्त्यावर इडली विकण्याची वेळ आली आहे.आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या दीपक उपरारिया यांना 18 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (HEC) रांची येथे आहे, ज्याला चांद्रयान-3 अंतराळयानाचे फोल्डिंग प्लॅटफॉर्म आणि स्लायडिंग डोअर बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दीपक उपरारिया यांनी या प्रकल्पाअंतर्गत चांद्रयान-3 मोहिमेत काम केले होते.
दीपक उपरारिया यांनी सांगितलं की, त्यांना 18 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. ज्यामुळे नाईलाजाने त्यांना हे काम करावं लागलं. इस्रोचे टेक्निशिअन दीपक रांचीच्या धुर्वा भागात जुन्या विधानसभेसमोर इडलीची एक प्लेट 15 रुपयांना विकतात. इस्रोच्या चांद्रयान-3
चा प्रक्षेपण पॅड तयार करण्यात त्यांनी मदत केली होती. दीपक उपरारिया यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी इडली विकायला सुरुवात केली आहे, पण त्यांनी HECची नोकरी सोडली नाही. आपलं काम सांभाळून ते हे काम करतात. ते सकाळी इडली विकतात आणि मग कामावर जातात. नोकरीवरून परत आल्यानंतरही ते पुन्हा इडली आणि चहा विकतात.