औद्योगिक वसाहतीला सुरळीत वीज पुरवठा द्या
उद्योजक, व्यापारी यांची अधिका-यांकडे मागणी
अकोला / प्रतिनिधी
औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांकडून महावितरणला चांगले उत्पन्न होते. परंतु ग्राहकांना समाधानकारक सेवा मिळत नाही. विजेच्या समस्यांवर तोडगा निघावा या उद्देशाने विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी औद्योगिक क्षेत्राला सुरळीत वीज पुरवठा करावा ही मागणी करण्यात आली.
चेंबरच्या अध्यक्ष निकेश गुप्ता, अकोला इंडस्ट्रीज असो. चे अध्यक्ष उन्मेश मालू, महावितरणचे संचालक आशीष चंदाराणा, मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, कार्यकारी अभियंता पैकिने,विजयकुमार कासट, अनिल उईके उपस्थित होते.
उन्मेश मालू प्रास्ताविकात म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील समस्या बाबत पूर्वी प्रमाणे तीन महिन्यात बैठक झाल्यास सोयीचे ठरेल. न्यूनतम वजावटीस सहा आठ महिने लागतात हे उचित नाही. अनियमित वीज पुरवठ्याचा विविध घटकांचवर परिणाम होतो. त्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे. ट्रीपिंगमुळे खूप नुकसान होते. अकोल्याला ३३ केव्ही. टेस्टींग व्हॅन उपलब्ध व्हावी अशी मागणी केली.
पवनकुमार कछोट यांनी महावितरणच्या कार्यप्रणाली ची माहिती दिली. अकोला एमआयडीसीला ४ उपकेंद्र व १४ फिडरवरुन वीज पुरवठा होतो. महावितरणला ६ कोटी रुपये उत्पन्न होते. २५ कोटी उत्पन्न राहिल्यास केबल व्हॅन उपलब्ध होऊ शकते. औद्योगिक क्षेत्रासाठी १४ कर्मचारी कार्यरत आहेत. या भागासाठी केंद्राच्या आरडीएसएस योजनेतून अपग्रेडेशन करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मर वाढवणार आहोत असे सांगितले. फिडरची क्षमताही वाढवित आहोत.
आशीष चंदाराणा यांनी गुणवत्तायुक्त सेवेचा अभाव दिसतो असे सांगितले. कंपनीचे खासगीकरण टाळण्यासाठी ग्राहकांना चांगली सेवा द्यावी लागेल. सुरुवातीला कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया, उन्मेश मालू, राजकुमार राजपाल, नितीन बियाणी, पंकज कोठारी, पंकज बियाणी, अरविंद अग्रवाल, नरेश बियाणी, किशोर बाछुका यांनी अतिथींचे स्वागत केले. संचालन चेंबरचे सचिव नीरव वोरा यांनी केले.
…