आर्थिक राजधानी च्या शेजारी रुग्णालयात अघोरी विद्येचा वापर

पालघर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
एकीकडे माणूस चंद्रावर पाऊल ठेवत आहे. तर दुसरीकडे जनतेची बुरसटलेली विचार सरणी अनेक उपाय करून देखील काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. अशिक्षित तर सोडा शिक्षित लोक सुद्धा अंधश्रध्येच्या आहारी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रात सतत होणाऱ्या प्रयोगामुळे वर्तमान काळात काही असाध्य आजार सोडले तर प्रत्येक आजारावर इलाज आहे. पण असे असतांना सुध्दा आजही लोक तंत्र मंत्रावर विश्वास करतांना दिसुन येतात. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबई च्या शेजारी असलेल्या पालघर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील तलासरी ग्रामीण रुग्णालयात एका तरुणाला सर्पदंश झाल्यानंतर दाखल करण्यात आले. सोमा लाडक्या ठाकरे असे सर्पदंश झालेल्या तरुणाचे नाव असून तो तलासरी तालुक्यातील करंजगाव येथे वास्तव्यास आहे. सोमा ठाकरे याला सापाने दंश केल्यानंतर त्याती प्रकृती बिघडल्याने त्याला तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात त्याच्यावर डॉक्टकरडून उपचार न करता मांत्रिकाने उपचार करण्यासाठी अघोरी विद्येचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या मांत्रिकाने अघोरी विद्येचा वापर केल्यानंतर काही वेळातच त्याची प्रकृती आणखी बिघडली. ज्यानंतर सोमा ठाकूर याला दादरा नगर हवेलीतील सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मांत्रिकाने रुग्णालयात अघोरी कृत्य करत उपचार केलेच कसे, असा प्रश्न निर्णाण होत आहे.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. या घटनेबाबत बोलताना रुग्णालयाकडून सांगण्यात आले की, संबंधित व्यक्तीला काल (ता. 08 ऑगस्ट) 03 वाजता सर्पदंश झाला, त्यानंतर त्याला संध्याकाळी सहा वाजता तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याला रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर आम्ही हा अघोरी प्रकार करु नका असा विरोध केला, मात्र त्यांनी ऐकले नाही आणि त्यांच्याच नातेवाईकांनी हा व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला आहे.