मोर्शी पोलिसांची मोठी कारवाई ; 10 लाख किमतीचे गोवंश जप्त
मोर्शी (तालुकाप्रतिनिधी)
अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या बडा दोस्त चारचाकी सह तीन बोलेरो पिकअप वेगाने येणाऱ्या चारही वाहनाला मोर्शी पोलिसांनी रोखून गोवंशसह एकूण 19 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात मोर्शी पोलिसांनी यश प्राप्त केले.
सदर घटना आज दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजताचे दरम्यान मोर्शी वरुड रोडवर असलेल्या भाईपूर गावाजवळ घडली.
महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा करून सुद्धा कायद्याला धाब्यावर बसवून मध्यप्रदेशातून गोवंशाची अवैध्य तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
दि.6 ऑगस्ट रोजी वरुड बेनोडा मार्गे मोर्शीकडे येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीची बडादोस्त चार चाकी वाहन क्र.एम.एच 30/ए.एल.4608, बोलेरो पिकअप वाहन क्र.एम एच 30/बीडी 4976,एम.एच.30/बिडी 4316,एम एच 29/बीई 1446 मध्ये एकूण 24 गोवंश अमानुषरित्या कोंबून येत असल्याची गोपनीय माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त झाल्यावर मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी तातडीने सापळा रचून त्यांची अधिनस्त पोलीस चमु यांनी पाळत ठेवून स्थानिक भाईपूर गावाजवळ नाकाबंदी करून चारही वाहनांना पकडण्यात यश प्राप्त केले.मात्र चारही वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाले.मोर्शी पोलिसांनी त्वरित गोवंशाना मोर्शी येथील गौरक्षणमध्ये चाऱ्या पाण्यासाठी रवाना केले.सदरची कार्यवाही मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वेरूळकर, अमोल बदुकले,सुभाष वाघमारे,योगेश सांभारे, मंगेश बदुकले,विक्रांत कोंडे,सचिन भाकरे, निखिल विघे,धर्मापाल उगले,सुमित पिढेकर, पिसे,संदीप वंजारी यांनी केली.
दिवसेंदिवस वाढत असलेली गोवंशाची अवैध्य वाहतूक डोकेदुखी ठरत असून या अगोदर सुद्धा आयशर गाडीने बॅरिगेट व पोलिसांना उडविण्याच्या घटना घडल्या तरी शासनाने या अवैध तस्करीवर वेगळा कायदा अमलात आणावा व आरोपी विरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी जोर धरत आहे.गोवंश तस्करी करणाऱ्यांची हिंमत पोलिसांना उडवण्याइतकी कशी होत आहे.यावर कोणाचा वरदहस्त आहे की काय?अशी चर्चा सुद्धा मोर्शी शहरात सुरू आहे.गोवंशाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या तस्करीला आळा घालण्यासाठी गोवंश विकणाऱ्यांवर व गोवंश घेणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी सुद्धा जनतेची मागणी आहे.गेल्या पंधरा दिवसात ही गोवंशाची तस्करी करणारी तिसरी कारवाई आहे.