दुचाकी चोरांना अटक 16 लाखांचा माल जप्त

आरोपींनी घरफोडीची दिली कबुली
नागपूर / विशेष प्रतिनिधी
नागपूर आणि अमरावती येथुन दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला वाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुरवातीला दोन आरोपींना अमरावती शहरातील गाडगेनगर भागातील एका बिअर बार मधून अटक केली आहे.
मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. अश्यातच दि. 25 जुलै रोजी वाडी निवासी वसंत निकारे यांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार वाडी पोलिसांना प्राप्त झाली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी सीसीटीव्ही व इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून तपास सुरू केला असता दोन आरोपी अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपले असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी सापळा रचून अमरावतीतील एका बिअरबारमधून ह्रितीक लेखीराम लांजेवार (२०, कंट्रोल वाडी, आंबेडकरनगर, नागपूर) व संकेत दीपक कडू (२१, श्रीनगर, अचलपूर, अमरावती) यांना ताब्यात घेतले
अगोदर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली आणि त्यांच्यासोबत कुणाल किसन बने (२८, रामबाग, नागपूर) व प्रितम उर्फ सिंधू उमाशंकर शर्मा (२८, कंट्रोल वाडी, आंबेडकरनगर) हे सहकारी असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांनादेखील अटक केली. या टोळीने अमरावती व नागपुरात वाहनचोरी तसेच घरफोड्या केल्याची कबुली दिली.
त्यांनी वाडीतून सहा, गिट्टीखदानमधून दोन, एमआयडीसी-अंबाझरी व अमरावतीतील राजापेठमधून प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यांच्या ताब्यातून एकूण १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच आरोपींनी वाडीत तीन व गिट्टीखदान-धंतोली-प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी केल्याचेदेखील सांगितले. त्यांच्या ताब्यातून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप रायण्णावार, विनोद गोडबोले, राहुल सावंत, गणेश मुंडे, तुलसीदास शक्ला, अजय पाटील, दुर्गादास माकडे, सोमेश्वर वर्धे, राहुल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.