स्व.राधाकिसन गांधी स्मृतीप्रित्यर्थ अंत्ययात्रेकरीता वैकुंठ रथाचे लोकार्पण.
वरूड/तूषार अकर्ते
शहराच्या वाढत्या विस्तारामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी शव नेत असताना मोठी कसरत करावी लागत होती. ही बाब विचारात घेऊन कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश गांधी यांनी वरुड तालुका माहेश्वरी संघटनेच्या सहकार्याने त्यांचे वडील स्व.राधाकीसन वल्लभदास गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहराच्या सेवेत वैकुंठ रथ समर्पीत करून त्याचे नुकतेच मान्यवरांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच क्षेत्रातुन अभिनंदन केल्या जात आहे.
शहरातील अभिषेक कॉट फायबर जिनिंग अन्ड प्रेसिंगचे संचालक तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश गांधी यांनी वरुड तालुका माहेश्वरी संघटनेच्या सहकार्याने स्व.राधाकिसन वल्लभदास गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडीलांच्या स्मरणार्थ वैकुंठ रथाची निर्मिती केली व त्याचे नुकतेच लोकार्पण रामदेवबाबा मंगलम सभागृहात आयोजीत डॉ.गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभा दरम्यान करण्यात आले. राजेश गांधी यांनी सर्वसामान्यांची अडचण विचारात घेऊन केलेल्या या कार्याचे कौतुक करून सर्वच मान्यवरांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. सध्या वरुड शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने काही परीसरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी सुमारे एक ते दोन किलोमीटर पर्यंत मोक्षधामाचे अंतर गाठावे लागत होते. त्यामुळे अंत्ययात्रे दरम्यान प्रेत नेत असतांना तारेवरची कसरत करीत सर्वसामान्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे राजेश गांधी यांनी त्यांच्या वडीलांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून वैकुंठ रथ तयार केला. या वैकुंठ रथाच्या लोकार्पणप्रसंगी सत्कारमुर्ती डॉ.गिरीश गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख,माजी आ. नरेशचंद्र ठाकरे, माजी पालकमंत्री तथा आ.यशोमती ठाकूर, आ. देवेंद्र भुयार, आ.प्रकाश गजभिये, कुलपती वेदप्रकाश मिश्रा, साहित्यीक डॉ.अक्षयकुमार काळे, पत्रकार बाळ कुलकर्णी, डॉ. राजेंद्र राजोरीया, माधव देशपांडे, मधुकर डाफे, प्रा.अरुण वानखडे, संतोष क्षिरसागर, डॉ.मनोहर आंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश गांधी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील इतर मान्यवर सुद्धा मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
चौकटीत.
वैकुंठ रथामुळे नागरिकांना दिलासा.
वैकुंठ रथाच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की ज्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन होते त्या कुटुंबावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी येत असलेली अडचण विचारात घेता वैकुंठ रथ तयार करण्याचे राजेश गांधी यांनी ठरविले. त्यानुसार हा वैकुंठ रथ तयार करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे वरुड शहरात अंत्यविधीसाठी असलेली वैकुंठ रथाची अडचण काही प्रमाणात दूर होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.