सामाजिक

आनंदनगरला मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट देवून साधला ग्रामस्थांशी संवाद

Spread the love

 

यवतमाळ  / अरविंद वानखडे

पैनगंगा नदीच्या पुरामुळे महागाव तालुक्यातील आनंदनगर येथे काल आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील नागरिकांना बचाव पथकाने सुरक्षितस्थळी हलविले होते. या गावाला आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांचे दु:ख जाणून घेतले.
जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्याकरिता जिल्हा दौऱ्यावर आलेले मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी आनंदनगर तांडासह नुकसानग्रस्त भागाची देखील पाहणी केली. या भेटीवेळी आनंदनगर येथे आ. इंद्रनिल नाईक, आ. नामदेव ससाने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, प्रशासनातील अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील आणि पालकमंत्री राठोड यांनी नागरिकांनी मांडलेल्या गावाचे पुनर्वसन, शेती पिकांची नुकसानभरपाई, घरे, संरक्षण भिंत आदी मागण्या जाणून घेतल्या. या मागण्यांचा प्रस्ताव शासनस्तरावर प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही केली जाईल. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे, पूरबाधित गावकऱ्यांना तत्काळ धान्य पुरवठा, पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश दिले. राज्य शासन आनंदनगर तांडा वासियांच्या पाठिशी उभे आहे, असे मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.

तत्पूर्वी मंत्री पाटील आणि पालकमंत्री राठोड यांनी यवतमाळ शहराजवळील वाघाडी या गावाला भेट देवून पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी पुरपरिस्थितीदरम्यान नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेल्या शिवालय येथील निवारागृहाला भेट देवू त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना सोयीसुविधा, अन्न धान्याचा पुरवठा आणि सानुग्रह अनुदानाबरोबर सर्वतोपरी मदत देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याचे मंत्री अनिल पाटील आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी नागरिकांना सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close