सर्वत्र आक्रोश आणि मातम ; दृश्य पाहून जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
पाच मृतदेह सापडले
लहान मुले दगावल्याची भीती ?
खालापूर / नवप्रहार वृत्तसेवा
खोलापूर येथील इर्शाल गडावरील डोंगर भागात राहणाऱ्या आदिवासी वस्तीवर दरड कोसळल्याने घडलेल्या दुर्घनेत 50 ते 60 घरे आणि 100 ते 200 लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रात्री 10.30 ते 11 वा. कॅग्या सुमारास घडल्याने लोक झोपेत होते.त्यामुळे 25 लोकांना या दरडीखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. तर हे भयंकर दृश्य पाहून मदत कार्यात सहभागी एका जवानाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.मुख्य म्हणजे या दुर्घटनेत लहान मुलांना पळता आले नसल्याने मोठ्या प्रमाणात लहान मुले दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 250 ते 300 लोक वस्तीचं हे गाव आहे. आदिवासी ठाकूर समाजाची ही वस्ती आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले होते. काल रात्री सर्वजण झोपेत असताना अचानक दरड कोसळल्याने या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली गेली आहेत. रात्री हा प्रकार घडल्याने एनडीआरएफची दोन पथके, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनीही रेस्क्यू टीमला मदतकार्यात मदत केले.
जवानाचा मृत्यू
इर्शालगडावर सहा किलोमीटर अंतरावर ही वाडी आहे. दोन किलोमीटरचा हा ट्रेक आहे. चिखल तुडवत आणि डोंगर चढत जात असताना अग्निशमन दलाच्या एका जवानाला धाप लागली. त्यानंतर वाडीवरील दृश्य पाहून एका अग्निशमन दलाच्या जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. इतर जवानांनी या जवानाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी या जवानाला मृत घोषित केले.
अंधारामुळे मदत कार्यास अडचणी
दरम्यान, रात्रीचा अंधार, धुकं आणि पावसामुळे अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला मदतकार्य करण्यास अडथळे येत होते. मात्र, तरीही रेस्क्यू टीमने रात्रभर जागून मदतकार्य केले. पहाट होताच पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी पोहोचले आहेत. तर गिरीश महाजन हे पहाटे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे काही वेळात घटनास्थळी पोहोचणार आहेत.
आक्रोश आणि मातम
दरम्यान, ही घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर वाडीतील लोकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बदलापूरहूनही एक कुटुंब आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आलं आहे. अनेकांच्या नातेवाईकांनी तर घटनास्थळी येताच समोरचं दृश्य पाहून टाहो फोडला. या दुर्घटनेत कुणाची मुलगी, कुणाचा जावई, कुणाचा मुलगा तर कुणाचे आईवडील दगावले आहेत.