देशाची राजधानी पाण्याखाली : कोसळधार पाऊस आणि युमुनेत पाणी सोडल्याने उद्भवली स्थिती
देशाची राजधानी पाण्याखाली : कोसळधार पाऊस आणि युमुनेत पाणी सोडल्याने उद्भवली स्थिती
दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क
मागीलनचार दिवसांपासून सुरू असलेला कोसळधार पाऊस आणि हरियानातून यमुनेत पाणी सोडल्या गेल्याने युमुनेला आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचले आहे. सकल भागात तर परिस्थिती बिकट आहे. अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर काहीनी पुलाचा आसरा घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालय, सचिवालय, लालकिल्ला, राजघाट मार्ग आदी महत्त्वाच्या ठिकाणांसह सर्वत्र पाण्याचा वेढा पडल्यामुळे हाहाकार उडाला आहे.
शेकडो लोकांनी पुलावर आसरा घेतला आहे. शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, या भयंकर आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एनडीआरएफचे 12 पथके तैनात करण्यात आली आहेत.
दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातील 9 राज्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हरयाणातील हथिनीपुंड बॅरेजमधून एक लाख क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. हे पाणी दिल्लीत यमुना नदीत पोहचले आणि महापूर आला. गुरुवारी सकाळी 10 वाजता यमुना नदीच्या पाणीपातळीत 208.53 मीटर इतकी वाढ झाली. पाणीपातळीने 45 वर्षांचे रेकॉर्ड मोडले. यमुनेचे पाणी वेगाने दिल्लीत घुसले आणि जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले.
दिल्लीत किमान तीन फूट पाणी असून, रस्त्यांना तळय़ाचे स्वरूप आले आहे. सखल भागात स्थिती भयंकर झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. दिल्लीला पाणीपुरवठा करणाऱया तीन जलकेंद्रांत पाणी शिरल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
परिस्थिती गंभीर; केंद्राने हस्तक्षेप करावा
दर तासाला परिस्थिती गंभीर होत चालली असून, केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सहकार्य करावे. लोकांनी घराबाहेर पडू नये, सुरक्षितस्थळी थांबावे असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू करावा अशी मागणी केली आहे.
तब्बल 706 रेल्वे रद्द
राजधानी दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि जम्मू-कश्मीरात मुसळधार पावसाने कहर माजविला आहे. नद्यांना पूर आणि दरडी कोसळत असल्याने मोठी हानी झाली. 100 वर लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक 80 जण हिमाचल प्रदेशातील आहेत. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील 300 एक्प्रेस रेल्वे आणि 406 प्रवासी रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.