भंडारा जिल्ह्यात आढळले चार सारस पक्षी
रविवार दिनांक १८ जून रोजी करण्यात आली सारस पक्षी गणना…
*नव प्रहार/भंडारा (जि. प्र.)*
भंडारा जिल्ह्यात सारस पक्षाची गणना दरवर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येते. यावर्षी सुध्दा रविवार दिनांक १८ जून रोजी सारस पक्षी गणना घेण्यात आली. त्यात भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी व तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदी व उपनद्यांच्या क्षेत्रातील संभावित सारस पक्षांचे अस्तित्व असलेल्या १९ ठिकाणी ही गणना करण्यात आली. दम्यान तुमसर तालुक्यातील गोंडीटोला येथील तलाव व लगतच्या शेती शिवारात सकाळी ६ वाजताच्या सुमारास चार सारस पक्षी विचरण करताना आढळन आले. यात दोन वयस्क व दोन समवयस्क सारस असुन, त्यांची नोंद करण्यात आली आहे.
सन २०१७ पासून भंडारा जिल्ह्यात नियमित सारस पक्षाची गणना भंडारा वन विभागाने सेव्ह इकोसिस्टेम अँड टायगर (सीट) भंडारा व सेवा संस्था तसेच गोंदिया या स्वयंसेवी संस्था सोबत संयुक्तपणे करण्यात येत आहे हे विशेष.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वयंसंज्ञानाने घेतलेल्या जनहित याचिकेनंतर दिलेल्या आदेशाने जिल्ह्याचा सारस संवर्धन आराखडा बनविण्यात आलेला आहे. सदर सारस गणना भंडारा जिल्हा सारस संवर्धन समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या नेतृत्वात व जिल्हा सारस संवर्धन समिती सचिव उपव .न संरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.