खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणी मागणाऱ्या लाचखोर API सह तिघांना अटक
तर शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी लाच मागणाऱ्या एचएम ACB च्या जाळ्यात
पिंपरी / नवप्रहार न्यूज नेटवर्क
लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे याबद्दल नागरिकांना सचेत करण्यात येते. पण असे असताना सुद्धा शासकीय कर्मचारी वरकमाईच्या मोहापायी लाचेची मागणी करतात. आणि मग कायदेशीर कारवाईला सामोरे जातात.यात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागते. तर काहीना सेवेतून बडतर्फ व्हावे लागते. समाजात बदनामी होते ती वेगळी. पण असे असतांना सुद्धा शासकीय कर्मचारी लाच मागणे काही सोडत नाही. महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1.50 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या API सह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे . तर दुसरीकडे शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 600 रु.ची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापिकेला ACB ने अटक केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सेक्टर क्रमांक २७, प्राधिकरण निगडी येथे शनिवारी (दि. १७) ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. तर दुसरी कारवाई नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे करण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, पोलिस कर्मचारी सागर तुकाराम शेळके, खासगी इसम सुदेश शिवाजी नवले (वय ४३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४८ वर्षीय महिलेने तिच्या ओळखीच्या व्यक्तीला हातउसणे व बँकेमधून कर्ज काढून पैसे दिले होते. मात्र, बँकेच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने तक्रारदार महिलेने उसणे दिलेल्या पैशांची मागणी केली. त्यामुळे संबंधित व्यक्तीने तक्रारदार ४८ वर्षीय महिलेच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. हा अर्ज चौकशीकामी सहायक पोलिस निरीक्षक अमोल कोरडे याच्याकडे होता. तक्रारदार महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक निरीक्षक कोरडे, पोलिस कर्मचारी सागर शेळके व खासगी इसम नवले यांनी तक्रारदार महिलेकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी कली. याबाबत तक्रारदार ४८ वर्षीय महिलेने ‘एसीबी’कडे तक्रार केली. त्यानुसार ‘एसीबी’ने महिलेच्या तक्रारीची पडताळणी केली. सहायक निरीक्षक कोरडे व पोलिस कर्मचारी शेळके यांच्यावतीने खासगी इसम नवले याने दीड लाख रुपयांची लाच मागणी केली व नवले याने केलेल्या लाच मागणीस सहायक निरीक्षक कोरडे व पोलिस कर्मचारी शेळके यांनी दुजोरा देऊनन सहाय्य केल्याचे समोर आले. त्यानुसार ‘एसीबी’ने शनिवारी सापळा रचला. त्यावेळी लाचेची दीड लाखांची रक्कम नवले याने स्वीकारली. त्यानंतर ‘एसीबी’ने तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
‘एसीबी’च्या पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले, निरीक्षक प्रवीण निंबाळकर, हवालदार नवनाथ वाळके, पोलिस कर्मचारी सौरभ महाशब्दे, शिल्पा तुपे, पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तर दुसरी घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे घडली आहे. तक्रारदार यांची मुलगी किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत उत्तीर्ण झाली होती. त्यामुळे मुलीचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी तिचे वडील १६ जून रोजी शाळेत गेले होते. यावेळी त्यांनी मुख्याध्यापिका विणा नेम्मानीवार यांच्याकडे टीसीची मागणी केली. त्यावर नेम्मानीवार यांनी टीसी काढण्यासाठी ६०० रुपये लागतील असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने ६०० रुपये कशासाठी असा प्रश्न केला. हे पैसे द्यावेच लागतील असे मुख्याध्यापिका नेम्मानीवार यांनी ठणकावले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
एसीबीने लाच मागणी पडताळणी केली असताना मुख्याध्यापिका नेम्मानीवार यांनी तडजोडीअंती ४०० रुपयांची मागणी केली. तसेच या पैशाची कोणतीही पावती मिळणार नाही असेही सांगितले. त्यानंतर शनिवारी शाळेतच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने मुख्याध्यापिका नेम्मानीवार यांना ४०० रुपये दिले. तसेच पावतीची मागणी केली; परंतु नेम्मानीवार यांनी पावती देण्यास नकार दिला. त्यानंतर नेम्मानीवार यांना एसीबीने ताब्यात घेतले. या प्रकरणात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.