अबब! मुकी मांडवल सापाच्या पोटातून एकामागुन एक बाहेर पडली सपाची तब्बल २० पिल्लं
मुरमाडी सावरी येथील प्रकार…
,लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी वनविभागाकडे सापांना सुपूर्त करुन दिले जीवदान…
*राजू आगलावे/भंडारा*
भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील मुरमाडी सावरी गावातील विष्णू नामदेव ईश्वरकर यांचे घरी मुकी मांडवल नावाचा (इंग्रजी नाव -कॉमन सँड बोआ) साप निघाल्याची माहिती लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या विवेक बावनकुळे याला मिळाली. माहीती मिळताच त्याने, त्वरित घटनास्थळ गाठून, मुकी मांडवल नामक सापाला पकडले. पण, काही वेळाने सदर सापाने पोटातून पिल्ले देण्यास सुरुवात केली, आणि एकामागुन एक तब्बल २० पिल्लं दहा मिनिटाच्या अवधीत बाहेर पडली. ह्या दुर्मिळ घटनेचा अनुभव अनेक नागरिक व ग्रीन फ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी घेतला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक स्थळी पोहचले व वनाधिकारी, वनकर्मचारी यांनी मौका पंचनाम्याची नोंद करुन, वनपरीक्षेत्राधिकारी सुरज गोखले यांच्या मार्गदर्शनात, लाखनीचे क्षेत्रसहाय्यक जे एम बघेले, गडेगावचे बिटरक्षक एम एल शहारे , त्रिवेणी गायधने तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सर्पमित्र सलाम बेग, मनीष बावनकुळे यांचेसह साप व पिल्लांना लाखनी येथील, पशुवैद्यकीय चिकित्सालयात नेण्यात आले. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत फडके व देशमुख यांनी सापाची व पिलांची तपासणी केली व नंतर त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षीत सोडण्यात आले. सद्या या घटनेची लाखनी तालुक्यासह जिल्ह्यात एकच चर्चा सुरू असुन,२० पिलांना तसेच मादी सापाला जीवदान दिल्याबद्दल सर्पमित्र मंडळी व नागरिकांकडून कौतूक होत आहे.
*सदर प्रकाराविषयी माहिती देताना ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी सांगितले की मुकी मांडवल, विषारी घोणस,फुरसे,बांबू पिट व्हायपर, तसेच बिनविषारी मांडोळ प्रजातीचे साप अंडे बाहेर न देता पोटातच अंडे फलित होऊन ते थोडे मोठे झाले की बाहेर पिल्ले पोटातील अंड्यातून परिपक्व झाल्यावर बाहेर पडत असल्याचे सांगितले. तसेच जरी हे साप पोटातून पिल्ले देत असले तरी त्यांना सस्तन प्राणी गटात टाकू नये. कारण हे सरपटणारे प्राणी रेपटाइल्स गटातच मोडत असल्याचेही सांगितले.*