नव्या सत्रासाठी मनपाच्या इंग्रजी शाळा होताहेत सज्ज सहाही शाळांमध्ये दुरूस्ती कार्य सुरू
नागपूर, / अमित वानखडे
नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्या शैक्षणिक सत्रासाठी सज्ज होत आहेत. शाळेच्या संचालनाची जबाबदारी असलेल्या ‘द आकांक्षा फाउंडेशन’द्वारे शाळांच्या दुरूस्तीचे कार्य सुरू करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी इतर शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यात कुठेही मागे राहू नयेत, या हेतूने मनपाद्वारे २०२१ साली इंग्रजी माध्यमांच्या शाळांची सुरूवात केली. पूर्व नागपुरात बाभुळबन मनपा प्राथमिक शाळा, पश्चिम नागपुरात रामनगर मनपा प्राथमिक शाळा, उत्तर नागपुरात राणी दुर्गावती मनपा प्राथमिक शाळा, दक्षिण नागपुरात रामभाऊ म्हाळगीनगर मनपा प्राथमिक शाळा, दक्षिण-पश्चिम नागपुरात स्व. बाबुराव बोबडे मनपा प्राथमिक शाळा आणि मध्य नागपुरात स्व.गोपालरावजी मोटघरे (खदान) मनपा प्राथमिक शाळा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सुरूवात झाली आहे.
नि:शुल्क दर्जेदार इंग्रजी माध्यमांचे शिक्षण आणि योग्य व्यवस्थापन यामुळे मागील दोन वर्षांमध्ये या शाळांना पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २०२३-२४ हे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शाळांमधील वर्गखोल्या आणि इतर सुविधांचे कार्य पूर्ण करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. ज्या शाळांमधील दुरूस्ती कार्य पूर्ण झाले आहेत. त्यांची चावी आकांक्षा फाउंडेशनचे शालेय संचालक सोमसुर्व चॅटर्जी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
मनपाचे शिक्षणाधिकारी राजेन्द्र पुसेकर यांनी सांगितले की, नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेद्वारे चालविण्यात येणा-या शाळांमधून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि नवीन युगाशी स्पर्धा करणारे शिक्षण मिळावे या उद्देशाने मनपाद्वारे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय मनपाच्या सभागृहात घेण्यात आला होता. या निर्णयानुसार शहरात दर्जेदार शाळांची निर्मिती व्हावी या करिता राज्यात विविध महानगरपालिकांद्वारे सुरू असलेल्या इंग्रजी शाळांची पाहणी करण्यासाठी पथक निर्धारित करण्यात आले. या पथकाद्वारे राज्यातील विविध ठिकाणी भेट देउन तेथील शिक्षण प्रणालीची पाहणी करण्यात आली. यामध्ये आकांक्षा फाउंडेशनद्वारे संचालित शाळांनाही भेट देण्यात आली होती. आकांक्षा फाऊंडेशनद्वारे पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई या चार महानगरपालिकांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे संचालन केले जात आहे. या सर्व शाळांना भेट दिल्यानंतर मनपाद्वारे या संस्थेला नागपूर
शहरातील इंग्रजी शाळांच्या संचालनाची देखील जबाबदारी सोपविण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा दर्जेदार शिक्षणासाठी कटिबध्द आहे.
शाळांच्या संचालनाच्या दृष्टीने मनपा आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार या शाळांसाठी ‘द आकांक्षा फाउंडेशन’चे तांत्रिक व आर्थिक सहकार्य लाभणार आहे. आकांक्षा फांउडेशन शालेय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वेतन खर्चाच्या प्रथम वर्षी ३० टक्के, दुस-या वर्षी ३५ टक्के, तिस-या वर्षी ४० टक्के, चवथ्या वर्षापासून पुढे सामंजस्य करार ४५ टक्के खर्च करणार आहे, उर्वरित खर्च मनपा करेल. पायाभूत सुविधा, विद्युत, पाणी, शाळा इमारत निर्माण व देखभाल दुरूस्ती, गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, गणवेश पुरक बाबी, शालेय सुरक्षा, स्वच्छता विषयक बाबींसह इतर खर्च मनपा करणार आहे.