अंगातील भूत काढतांना झालेल्या मारहाणीत बालकाचा मृत्यू
इरळी (ता. कवठेमहांकाळ)
एकीकडे देशात जीवघेण्या आजारावर प्रभावी औषध शोधल्या जात असतांना मात्र काही भागात अंधश्रद्धेने पाय पसारले असल्याने नागरिक तांत्रिक आणि भोंदू बाबाच्या नादी लागून जीव गमावत आहेत. भूतबाधा उतरवण्याचा नावावर भोंदूबाबा कडून करण्यात आलेल्या मारहाणीत बालकाचा मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकातील शिरगूर (ता. रायबाग) येथे घडली.
आप्पासाहेब कांबळे असे मांत्रिकाचे तर आर्यन दीपक लांडगे 14 असे त्या बालकाचे नाव आहे. . मृत मुलाची आई कविता (३५) यांनी आज सायंकाळी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आर्यन बहीण अस्मितासह उन्हाळी सुटीसाठी मामाच्या गावी शिवनूर (ता. अथणी) येथे गेला होता. समवेत त्याची आईही होती. त्याआधी आर्यनची तब्येत बिघडल्याने १३ रोजी सुभाषनगर (ता. मिरज) येथील खासगी दवाखान्यात दाखवले होते. तिथून श्रीमती कविता माहेरी गेल्या.
तेथेही आर्यनची तब्येत बिघडल्याने शेजारच्या एका महिलेने शिरगूर (ता. रायबाग) येथील मांत्रिक आप्पासाहेब पाटील याच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. श्रीमती कविता यांना अडचण होती म्हणून त्यांनी भावासह मुलास 18 रोजी मांत्रिकाकडे पाठवले. नातेवाइकांनी मांत्रिकाकडे नेले असता त्याने आर्यनच्या गालावर, मांडीवर, पाठीवर अमानुष मारहाण केली.
त्या अवस्थेत आर्यनला अथणी येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सांगितल्याने मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्याचा शुक्रवारी (ता. 19) उपचारांदरम्यान रात्री दहा वाजता मृत्यू झाला. त्यानंतर मिरजेत महात्मा गांधी पोलिस ठाण्यात तशी नोंद करण्यात आली.
त्यानंतर आज हा प्रकार समजल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते फारुक गवंडी, सचिन करगणे, दिगंबर कांबळे, भगवान सोनंद यांनी गावी जाऊन नातेवाइकांची भेट घेऊन आधार दिला. त्यावेळी नातेवाइकांशी चर्चा करून आर्यनचा मृत्यू मांत्रिकाच्या मारहाणीमुळेच झाल्याचे दिसते. त्यामुळे संबंधित मांत्रिकावर कठोर कारवाई करावी.
कवठेमहांकाळ ठाण्याचे सहायक निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे समितीच्या कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणे मांडताच त्यांनी तत्काळ आर्यनच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तिचे म्हणणे ऐकून घेऊन फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. संबंधित गुन्हा कुडची पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तेथील पोलिसांकडे वर्ग केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.