अभ्यास करून माहितीसह बैठकीला या – खा.सुनिल मेंढे
दिशा समिती बैठकीत खासदार अधिकाऱ्यांवर संतापले.
भंडारा: / प्रतिनिधी
योजनांची पुरेपूर माहिती आणि योग्य अभ्यास करूनच यापुढे बैठकीत उपस्थित रहावे. अर्धवट माहितीसह आल्यास काहीही ऐकून घेतले जाणार नाही व कारवाईला समोरे जावे लागेल असे स्पष्ट संकेत खासदार सुनील मेंढे यांनी आज दिशा समितीच्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी खासदारांनी काही अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवरही धरले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच दिशा समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात घेतली गेली. दिशा समितीचे अध्यक्ष खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुरुवातीलाच खासदारांनी मागील बैठकीत कुठलेही पूर्वसूचना न देता अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजाविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. केंद्र शासनाच्या ग्रामीण भागासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ही बैठक घेतली जाते. योजनांच्या बाबतीत अधिकारी फारसे गंभीर नसल्याचे लक्षात आल्याने अनेक विषयांना घेऊन या बैठकीत खासदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
ग्रामीण भागात विकास गंगा पोहोचविण्याचे काम करण्याची क्षमता असलेल्या नरेगा योजनेचा आढावा घेताना खासदार संतापले. या योजनेची पाहिजे त्या प्रमाणात अंमलबजावणी होत नाही. आवश्यक तो प्रचार प्रसार अधिकाऱ्यांकडून केला जात नाही. भविष्यात सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या नरेगाच्या योजना गावागावात पोहोचाव्यात म्हणून प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नरेगा अंतर्गत येत असलेल्या पांदण रस्त्याचा विषयही मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी पांदण रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या मुरूम चा विषय निकालाची जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कृषीप्रधान देशात त्यातही कृषीवर आधारित भंडारा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अनेक योजना आहेत. मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचविल्या जात नाही. कृषी सहाय्यक आणि अधिकारी कामाप्रती गंभीर नाही. कृषी विभागाने ग्रामीण भागात संपर्क करून या योजना पोहोचवाव्या. यासाठी प्रगतिशील शेतकऱ्यांची मदत घेतली जावी असे निर्देशही देण्यात आले. ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या रस्त्यांचा दर्जा कुठेही कमी असू नये. जलजीवन मिशन ची कामे प्राधान्याने पूर्ण करा. आरोग्याच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अधिक परिश्रम घ्या आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अपेक्षित काम आजही होत नसल्याने त्या दृष्टीने मिशन मोडवर प्रयत्न करा असे निर्देश खासदारांनी दिले. घनकचरा व्यवस्थापन साठी शासन निधी देतो मात्र कुठेही त्याचे योग्य नियोजन होऊन परिणाम दिसत नाही हा विषय गंभीर असल्याचे ते म्हणाले.
अनेक अधिकारी बैठकीला येताना केवळ औपचारिकता म्हणून येतात. अशा अधिकाऱ्यांनी हा गैरसमज ठेवू नये. योग्य अभ्यास आणि सबूत माहिती घेऊन बसावे अन्यथा अशा अधिकाऱ्यांना सहन केले जाणार नाही असेही खासदारांनी स्पष्ट केले.
दिशा समितीच्या पूर्वी रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. अपघात प्रवणस्थळ शोधून ते दुरुस्त करण्याचे निर्देश खासदारांनी दिले. तयार होत असलेल्या रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी कंत्राटदराने काम करावे. मार्गावर असलेले विद्युतीकरण नादुरुस्त राहील यासाठी लक्ष असावे असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, DRDA चे विवेक बोंद्रे, विनोद बांते, मोहन सूरकर, सौ.माधुरी नखाते, भोजराम कापगते, डॉ. शांताराम चाफले, संदीप नंदरधने, प्रकाश कुर्झेकर, सचिन कुंभलकर, नंदू रहांगडाले, नूतन कुर्झेकर, महेंद्र शेंडे, बिसन सयाम, विलास डहारे, गणेश आदे तथा उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.