सामाजिक

लग्नकार्य घरचे, आहेर मात्र शासनाला!…

Spread the love

 

सर्व सेवांसाठी जीएसटी लागू,

समारंभाच्या खर्चात वाढ,

भंडारा प्रतिनिधी / अजय मते

उन्हाळा आला की, मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभ सुरू असतात. सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात सुरू आहे. हौसेसाठी लाखोंचा चुराडा होत आहे. ‘कृपया भेटवस्तू किंवा आहेर आणू नये, आपली उपस्थिती हाच आहेर’ अशी टीप लग्नपत्रिकेत हमखास लिहिलेली असते. तरीसुद्धा जवळचे नातेवाईक व मित्रपरिवाराकडून आहेर, भेटवस्तू दिल्या जातातच. मात्र जेवणाच्या घासापासून सर्वच सेवांसाठी भरावा लागणारा जीएसटी या आहेरापेक्षा कितीतरी अधिक पटीने शासनाकडे जमा होतो.
लग्नासह सर्वच समारंभाच्या खर्चात वाढ झालेली आहे. लग्नकार्य घरचे असले तरी खरा आहेर शासनालाच मिळत आहे. लग्नकार्य प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असतो. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक वर-वधू पक्षाचा कल असतो. थाटात लग्नकार्य करण्यासाठी प्रसंगी कर्ज काढून खर्च करण्याची तयारी केली जाते. मध्यमवर्गातील एका लग्नसोहळ्यासाठी साधारणपणे पाच-दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. या खर्चाची सुरुवात
लग्नाच्या वस्त्यापासून होते. कपडे खरेदी करताना त्यावरही कर लागतो. पुन्हा ते शिवताना होणाऱ्या बिलावर व त्यानंतरच्या प्रत्येक खर्चावर कर भरावा लागतो. निमंत्रण पत्रिका, कार्यालय ते जेवणापर्यंत सर्वच गोष्टींना आता कर भरावा लागतो. किराणा, गॅस, कॅटरर्स, प्रवास, लग्नाआधी व लग्नकार्यात पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवा, विविध विधींचा मेकअप, थीम, डेकोरेशन, आदींचा खर्च भरमसाठ आहे. यासाठी सुमारे ९० ते ९२ हजार रुपयापर्यंत जीएसटीचा कर शासनाला जमा होतो. कार्यमालकाला येणाऱ्या आहेरापेक्षा शासनाला मिळणारा जीएसटीचा आकडा तुलनेने मोठा होत आहे. लग्नकार्य घरचे असले तरी खरा आहेर शासनालाच मिळत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
…………………………………………..
सर्वसामान्यांना मुला-मुलींचे लग्न करणे झाले अवघड..!
महागाईने डोके वर काढल्याने गरीब शेतकरी, शेतमजुरांना मुला-मुलींचे लग्न करणे अवघड झाले आहे. प्रत्येक वस्तूवर जीएसटी कर भरावा लागत असल्याने वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे लग्नाचा भार यांना झेपत नाही. अनेक गोरगरीब आपल्या पाल्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करतात. महागाई दुप्पटीपेक्षाही वाढली; मात्र शेतमालाला भाव ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात उत्पन्नाऐवजी नुकसानच सहन करावे लागते. त्यामुळे आपल्या मुला-मुलींचे लग्न कसे करावे? असा प्रश्न शेतकरी, शेतमजुरांना पडत असतो.

‘रिसेप्शन’वरही कराचा भार…,
वायफळ खर्चाला फाटा देत नोंदणी पद्धतीने विवाहाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे लग्न कमी खर्चात होते. लग्नातील हौस पूर्ण कराण्यासाठी रिसेप्शनचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. रिसेप्शनसाठी कमीत कमी दोन लाखांपासून पुढे ऐपतीप्रमाणे खर्च केला जात आहे. त्यासाठी सर्व सेवांवर जीएसटी भरावा लागत असल्याने रिसेप्शनवरही कराचा भार पडत आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close