भंडारा नगरीत प्रथमच भव्यदिव्य श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन
नामवंत कलावंताच्या माध्यमातून गुंजणार जय श्रीरामचा नारा
आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात जय्यत तयारी
प्रतिनिधी/भंडारा: भंडारा नगरीत २५ मार्च ते २९ मार्च या कालावधीत भव्य दिव्य श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन माधव नगर रेल्वे मैदान, खात रोड येथे करण्यात आले आहे. नामवंत गायक कलावंताच्या उपस्थितीत जय श्रीरामचा नारा गुंजणार असून प्रायोजक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने शोभायात्रा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागील २ – ३ वर्षात कोरोनाच्या संकटामुळे श्रीराम भक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. या वर्षी भंडारा विधानसभा क्षेत्राचे युवा आमदार यांनी या वर्षीचा श्रीराम जन्मोत्सव अविस्मरणीय व्हावा याकरिता पुढाकार घेतला असून देश पातळीवर गाजलेल्या गायक कलाकारांना भंडारा नगरीत आमंत्रित केले आहे.
२५ मार्च ला हर हर शंभू फेम अभिलीप्सा पांडा यांच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम साय. ५.३० ते १० कालावधीत होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित राहतील तर उद्घाटक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य अतिथी पोलीस अधीक्षक लोहित मताणी, जि. प.कार्यकारी अधिकारी विनय कुर्तकोटी, न.प. कार्यकारी अधिकारी विनोद जाधव उपस्थित राहतील. दुसर्या दिवशी २६ मार्चला कृष्णलीला, मयूर नृत्य, पुष्पहोलि (वृंदावन) महारास कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नरेंद्र भोंडेकर तर उद्घाटक माजी राज्यमंत्री परिणय फुके, मुख्य अतिथी खासदार सुनील मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, माजी आमदार बाळा काशिवार, भाजप जि.प.गटनेते विनोद बांते उपस्थित राहतील.
२७ मार्च ला सुप्रशिद्ध गायिका वैशाली रायकवार भोपाल यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेत प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार चरण वाघमारे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी राज्यमंत्री विलास श्रुगारपवार, जिल्हा बँक अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश महासचिव धनंजय दलाल उपस्थित राहतील.
याच शृंखलेत २८ मार्च रोजी शहनाज अख्तर या विख्यात गायिकेच्या माध्यमातून जय श्रीरामचा नारा गुंजणार आहे. या कार्यक्रमाची अध्यक्षता आमदार नरेंद्र भोंडेकर करतील. तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, माजी आमदार अनिल बावनकर, शिवसेना जिल्हा संघटक आशिष माटे, शिवसेना विधानसभा संघटक बंडू हटवार आदी उपस्थित राहतील.
२९ मार्चला होणाऱ्या भव्य महानाट्य कार्यक्रमत अध्यक्षस्थानी आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित राहतील तर प्रमुख अतिथी विहिप चे पूर्व प्रांत अध्यक्ष राजू वालिया, विहिप विदर्भ प्रांत उपाध्यक्ष संजय एकापुरे, रा.स्व.संघ भंडारा विभाग प्रचारक सुजित कुंभारकर, भंडारा नगर संघ चालक पंकज हाडगे, विहिप भंडारा विभाग मंत्री रमन सिंघेल उपस्थित राहतील.
३० मार्चला श्रीराम नवमी निमित्त श्रीराम शोभा यात्रा समिती तर्फे सायंकाळी शहरातून भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष हेमंत आंबेकर व श्रीराम जन्मोत्सव समितीचे संयोजक जैकी रावलानी यांनी केले आहे.