महात्मा फुले महाविद्यालय वरुड येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न
वरुड(प्रतिनिधी)दि.२१/६
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा सलग्नित वरुड येथील महात्मा फुले कला वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरूड येथे नुकताच ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी एन चौधरी यांनी या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सभागृहाला संबोधित करताना सांगितले की आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ साठी “मानवता” ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे.
सदर योग शिबिराकरिता डॉ.पी.आर. पुंडकर यांनी प्रशिक्षण दिले, त्यामध्ये त्यांनी विविध योगासने जसे की
नमस्कार आसन, वज्रासन, अर्ध चन्द्रासन, नटराज आसन, गोमुख आसन, सुखासन, योग मुद्रासन, सर्वांगासन, ताडासन, शवासन इत्यादी बद्दल माहिती देत प्रशिक्षण दिले. सदर शिबिरा करिता महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.