बपेरा बावनथडी नदी पात्रातील जुगार व दारुड्यावर पोलिसांची धाड

सिहोरा :पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत येत असलेल्या बपेरा येथे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक रश्मिता राव यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह अवैध जुगार व दारू अड्ड्यावर धाड घालून आरोपीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. सविस्तर घटना अशी की, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह बपेरा गाठून बावनथडी नदीच्या कोरड्या पात्रात जुगार खेळणाऱ्यांना रंगेहात पकडले. यात जुगार खेळणाऱ्यांच्या ताब्यातून तास पत्तीसह 59,232 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार बंदी कायदा अनव्ये आरोपी आशिष नागदेवे, कुमार निनावे, उमराव राऊत, अनिल शेंद्रे, भुमेश्वर उचीबगले सर्व राहणार बपेरा यांच्यावर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अवैध दारू अड्ड्यावर धाड घालून दारू विक्रेते उषा तरुण खैरागडे व गुनिता रणजीत नागदेवे राहणार बपेरा यांच्या ताब्यातून एकूण 73 हजार 800 रुपयांचा मुद्देमात जप्त केला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सहायक पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांच्या नेतृत्वात सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश गोसावी, पोलीस उपनिरीक्षक मूलचंद मेश्राम, पोलीस हवालदार इडपाते, पोलीस शिपाई तिलक चौधरी, पोलीस हवालदार कडपाते यांनी केली असून या कारवाईने मात्र अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.