निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची ६८ वी पुण्यतिथी संपन्न
हिवरखेड. *निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज* यांच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,हिवरखेड येथे २० डिसेंबर रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुनंदा दातीर मॅडम (प्राचार्या ) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुभाष पारीसे सर तसेच प्रा. अमोल इंगळे सर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमातील पाहुण्यांच्या हस्ते कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी गाडगे बाबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रा. पारीसे यांनी गाडगे बाबांचा धगधगता अग्निकुंड जीवनपट उलगडून दाखवला. अमरावती जिल्ह्यातील तीन ख सम्राटांपैकी गाडगेबाबा हे खराट्याचे सम्राट म्हणून सर्व भारतीयांना परिचित आहे. खराटा हे स्वच्छतेचे प्रतीक असल्याने गाडगेबाबांनी गावातील घाण, कचरा स्वच्छ करण्यासोबतच त्या गावातील लोकांच्या डोक्यामध्ये , मनामधील अंधश्रद्धा, वाईट चालीरिती , रूढी-परंपरा, सामाजिक विषमता उच-निचता , अडानीपणाची घाण आपल्या कीर्तन, समाज प्रबोधनातून स्वच्छ करण्याचे कार्य अहोरात्र केले.
जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले!!
तोची साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!!
या तुकारामांच्या उक्ती प्रमाणे गाडगेबाबांचे कार्य असल्याचे पटवून दिले.
श्रीमती दातीर मॅडम यांनी सुद्धा गाडगे बाबांच्या कार्याचा अवाका किती मोठा होता हे पटवून देतांना विद्यार्थ्यांनी सुद्धा यातून चांगले विचार आत्मसात केले पाहिजे हे सांगितले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन श्री गजानन आमले यांनी गाडगेबाबांच्या आवडत्या भजनाने केले. प्रा. इंगळे सरांनी पाहुण्यांचे तसेच कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानलेत. या कार्यक्रमाला शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते तसेच शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.