विद्युत पोलला स्पर्श झाल्याने ५ गायीचा मृत्यू
उमरी पठार शेत शिवारातील घटना
प्रतिनिधी | दिग्रस
तालुक्यातील झिरपुरवाडी येथील एका गुरख्यांनी गावातील गायी चराईसाठी जातेवेळी उमरी पठार शेत शिवारातील ३३ केव्हीच्या विद्युत पोलला स्पर्श झाल्याने ५ गायीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ मे रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की १९ मे रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामुळे परिसरातील ३३ केव्ही विद्युत पोलची तार तुटून पोलला स्पर्श असल्याने त्या पोलला विद्युत प्रवाह सुरू होता. त्या विद्युत पोलच्या स्पर्शाने ५ गायीचा जागीच मृत्यू झाला व अस्तवस्त अवस्थेत जागीच जमिनीवर कोसळल्या. झिरपुरवाडी येथील पशु पालक रामु भस्मे, ज्ञानेश्वर राठोड, , प्रकाश राठोड, बळीराम डहाके यांची प्रत्येकी एका गायीचा या घटनेत मृत्यू झाला. तर उमरी पठार येथील एका गायीचा मृत्यू झाला. गुराख्यानी या घटनेची माहिती झिरपुरवाडीचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांना दिली. सरपंचांनी विद्युत वितरण कंपनी कनिष्ठ अभियंता राजेश झा यांना माहिती दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून याची शेतकऱ्यांनी तक्रार आर्णी पोलिसात केली असल्याचे समजते.
चौकट
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे 33 केव्ही लाईनची जिवत तार तुटून लोंबकळत असल्याने पोलला करंट असल्यामुळे चार गायी, एका बैलाचा मृत्यू झाला. तात्काळ पंचनामा, पोस्ट मार्टन रिपोर्ट, चौकशी करुन महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.
पुरुषोत्तम कुडवे सरपंच