२५ वर्षानतर तिने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला

ही बातमी कदाचित तुम्हाला एखाद्या चित्रपटाचे कथानक वाटेल पण ही बातमी सत्य घटनेवर आधारित आहे. ही धाडसी बातमी आहे एका मुलीची . जिने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पोलिसात भरती झाली. आणि आपल्या वडिलांच्या खुन्याला शोधून काढून त्यांच्या हत्येचा बदल घेतला.
गिस्लेने सिलवा डे देउस असं त्या मुलीचं नाव. गिस्लेने ९ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांची कुणीतरी गोळ्या झाडून हत्या केली. बालवयात चटका लावणाऱ्या या गोष्टीमुळे ती पूर्ण डिस्टर्ब झाली होती. ५० पौंड म्हणजेच सुमारे ५५०० रुपयांच्या कर्जाच्या रकमेवरून त्यांचा खून करण्यात आला होता.
ब्राझीलमधील बाओ विस्टा येथील एका बारमध्ये रेमुंडो गोम्स नावाच्या व्यक्तीसोबत तिच्या वडिलांचा वाद झाला. गिलवाडो कर्जेची रक्कम वेळेत देऊ शकले नाहीत, म्हणून दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद सुरु असतानाच गोम्स तेथून निघून गेला आणि काही वेळाने पिस्तुल घेऊन परतला. त्याने गिस्लेनेच्या वडिलांना गोळ्या घातल्या आणि तिथून पळ काढला. पोलिसांनी कायदेशीररित्या कारवाई केली. पण गुन्हेगाराला पलायन करण्यात यश मिळाले. पोलिसांचा शोध सुरु होताच. पण त्यानंतर मारेकरी सापडला नाही.
दुसरीकडे गिस्लेनेही मोठी होत गेली. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर तिच्या खांद्यावर जबाबदारी पडली. बहिणींचा सांभाळ करत तिने कायद्याचा अभ्यासही सुरु केला. २००७ साली १८ व्या वर्षात सुरु केलेला अभ्यास २०२३ साली ती वकील झाली.
२०२३ साली गिस्लेनेनी सिव्हिल पोलिस भरतीची परीक्षा दिली आणि २०२४ च्या सुरुवातीला ती उत्तीर्ण झाली. पोलीस खात्यात नियुक्ती होताच, क्राईम ब्रांचमध्ये आपली नियुक्ती करावी अशी तिने विनंती केली. गिस्लेनेला ठाऊक होते, वडिलांच्या मारेकरीला पकडायचं असेल तर, तिला या ब्रांचमध्ये जाणं गरजेचं आहे.
त्या विभागात नियुक्त होताच तिने कंबर कसली. वडिलांच्या मारेकरीचा शोध सुरु केला. २०१९ साली आरोपी रेमुंडो गोम्स विरोधात वॉरंट जारी करण्यात आल्याचे उघड झाले. नंतर अनेक दुवे जोडत, तिने रेमंडोला शोधून काढले. आणि अखेर सप्टेंबर महिन्यात ती व तिच्या टीमने ब्राझीलमधील बोआ व्हिस्टा शहराच्या बाहेरील भागात आरोपीला अटक केली.
अटक झाल्यानंतर वेळ न दवडता आरोपीला न्यायलयात हजर करण्यात आले. जिथे त्याला १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. रेमंडोला अटक केल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपीसमोर ती एकच वाक्य बोलली. ‘तू माझ्यामुळे येथे आहेस आणि आता तुला त्रास होणार.’ यांनतर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला. आणि ‘अखेर आम्हाला शांतता मिळाली आणि न्याय मिळाला.’ असं कॅप्शन दिलं. एका लेकीची ही जिद्द जगभर अर्थातच चर्चेचा विषय ठरली.