सामाजिक

०८ डिसेम्बर २०२३ जयंती निमित्य लेख

Spread the love

 

बहुजनांना जागे करनारे व बहुजनसमाज घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका असणारे विद्रोही संत : श्री संताजी जगनाडे महाराज

महाराष्ट्र हि संतांची भूमी असुन , या माती मध्ये खूप संत होऊन गेले तसेच या सर्व संतांनी कधी कोण्या एका समाजासाठी काम केले नसुन तर संपूर्ण मनुष्यजातीच्या कल्याणासाठी काम केले आहे . या सर्व संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा संदेश दिला. त्या थोर संतान मध्ये असलेले एक महान विद्रोही संत म्हणजेच श्री संताजी जगनाडे महाराज . जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे ते पट्ट शिष्य व तुकाराम महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मोठे योगदान दिले . तुकाराम महाराज यांच्या १४ टाळकरी मध्ये संताजी महाराज मानले जात असत .
संताजी महाराज यांचा जन्म ०८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला . आजोबा भिवासेठ जगनाडे , वडील विठोबासेठ व आई सुदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई . संताजींचे शिक्षण लिहिता वाचता येणे व हिशोब ठेवता येणे यापुरते होते . घराची परिस्थिती तशी चांगली होती. वयाच्या १० वर्षीच वडिलांनी त्यांना तेलाच्या व्यवसायाचा परिचय करून दिला. संताजी महाराजांचा विवाह ११ वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील यमुनाबाई यांच्या सोबत झाला. दोघेही वयाने फारच लहान असल्याने संसार म्हणजे काय हे त्या दोघांना ज्ञात नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. संताजी महाराज व तुकाराम महाराज यांची सर्व प्रथम भेट शके १५६२ मध्ये म्हणजे जानेवारी १६४० मध्ये झाली. तिथूनच तुकाराम महाराजांनी संताजींना आपल्या सानिध्यात ठेवले.
तुकाराम महाराज यांच्या चरित्राचे लेखक म्हणून संताजी महाराजांचे लेख व भजने आढळून येतात. वास्तविक तुकाराम महाराज यांना उत्तम प्रकारे लिहिता वाचता येत होत पण कीर्तनाप्रसंगी त्यांच्या तोंडून निघणारे शिघ्रकाव्य व नवीन नवीन अभंग संताजी महाराज लिहून ठेवत असत. संताजी महाराजांनी जगद्गुरू तुकाराम महाराज यांना गुरुस्थानी मानलं होत. संताजी महाराजांन मुळेच आपल्याला संत तुकाराम महाराजांचा अनमोल साहित्याचा ठेवा आपल्याला मिळाला आहे. तुकाराम महाराजांचे हजारो अभंग त्यांचीच संग्रहित करुन ठेवले आहेत. तुकाराम महाराज यांचा महिमा आपल्याला फक्त आणि फक्त श्री संताजी महाराज यांच्या मुळेच समजला, त्याला इतिहास साक्ष आहे. त्यांनी स्वतः रचलेले घाण्यावरचे अभंग आजही बऱ्याच ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात ऐकावयास मिळतात. तुकाराम महाराज यांची गाथा हि फक्त संताजी महाराज यांच्या कठोर परिश्रमामुळेच जिवंत राहू शकली. तुकोबारायांच्या रोज होणाऱ्या कीर्तन आणि अभंगातून सामान्य माणसाच्या समस्येचे निवारण होत असे. समस्येचे निवारण करण्यासाठी तेव्हा कोणीच धर्ममार्तंडयाकडे जात नव्हते. त्यामुळे वैदिकांचे नुकसान होऊ लागले. त्यांना दक्षिणा मिळणे व मान सन्मान मिळणे बंद झाले होते. आणि त्याचा सर्व राग तुकाराम महाराज यांच्यावर निघाला. तुकाराम महाराजांच्या विरोधात धर्म सभा घेऊन धार्मिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्या ठिकाणी रामेश्वर भट स्वतः न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. आणि त्यांनी निर्णय दिला तो असा…. ”तुकारामांना गाथा लिहिण्याचा अधिकार नाही, कारण ते शूद्र आहेत. कीर्तन करण्याचा अधिकार नाही. त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना गावातून हाकलून द्या आणि त्यांची गाथा इंद्रायणी नदीत बुडून टाका.” अश्या प्रकारचा निकाल स्वतः रामेश्वर भटांनी दिला. तुकाराम महाराजांना अनेकदा मारहाण सुद्धा झाली. या सर्व प्रसंगाचे संताजी महाराज स्वतः साक्षीदार होते. संताजी महाराजांवर सुद्धा अनेकदा हल्ले झालेले आहेत. रामेश्वर भटाने दिलेल्या निकालानुसार आयुष्यभर कष्ट करून अभंगाचे लिखाण केलेल्या सर्व वह्या धार्मिक दबावामुळे अखेर इंद्रायणी मध्ये बुडविण्यात आल्या. अश्या वेळी संत जगनाडे महाराज यांनी आपल्या प्रबळ समरण शक्ती च्या जोरावर आणि गावो गावी फिरून सर्व अभंग, कीर्तन गोळा करून पुन्हा जशेच्या तसे लिहून काढले आणि आज पर्यन्त ते तसेच आहेत. त्यांनतर या महान संतांचे वयाच्या ७६ व्या वर्षी मार्गशीष वद्य १३ ला निधन झाले. सदूंबरे याठिकाणी त्यांचे समाधी स्थळ आहे. संताजी महाराज समाधिस्थ झाल्यापासून चाकण , खेड,कडूस,पुणे शहर व महाराष्ट्र्याच्या कान्याकोपऱयातून लोक तिथे येतात. संताजी जगनाडे यांनी घाण्यावरील अभंगात अध्यात्माचे रूपक मांडले आहे. मनुष्याचे देह म्हणजे घाना असे रूपक मांडून त्यांनी अभंग रचना केली. मानवी देह हा तेलाचा घाना असेल तर त्यातून निघणारे तेल हे चैतन्य आणि सुविचारांचे तेल आहे असे सुंदर विचार आणि अभंग त्यांनी मांडले.
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मुळेच आपल्याला तुकाराम महाराजांची गाथा आपल्या पर्यंत पोहचली. त्यांचे हे मनुष्य जाती व मराठी भाषेवर ऋण आहे. पण शोकान्तिका अशी आहे कि, त्यांनी लिहिलेल्या अभंगाकडे आणि अन्य साहित्याकडे अजूनही कोणाचे लक्षच गेले नाही. अश्या या महान संताचा विसर पडू नये, हीच अपेक्षा…. आज संत संताजी महाराज यांची जयंती त्यानिमित्य विनम्र साष्टांग नमस्कार !

*प्रशांत वि. घुसे*
अंजनगाव सुर्जी
९१७२६१९१९२

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close