जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी सीमाताई बोके यांची नियुक्ती

- मनोहर मुरकुटे, अंजनगाव सुर्जी
अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अंजनगाव सुर्जी येथील सीमाताई बोके यांची लाखो महिलांचे लढाऊ आणि वैचारिक संघटन असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. सीमाताई बोके ह्या उत्तम वक्ता असून कुशल संघटक आहे.तसेच वृत्तपत्रांमध्ये नेहमी लिखाण करणाऱ्या स्तंभलेखक सुद्धा आहे.मराठा सेवा संघ प्रणित लाखो महिलांचे आक्रमक संघटन असलेल्या जिजाऊ ब्रिगेडमध्ये त्या मागील २५ वर्षापासून कार्यरत आहे.अनेक वर्षेपर्यंत त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून संघटनेत काम केलेले आहे.विविध प्रश्नांवरील आंदोलने,मोर्चे यामध्ये त्या नेहमी अग्रेसर असतात.महिलांच्या समस्या,प्रश्न,अडचणी घेऊन सीमाताई जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवत असतात.तसेच देशात घडणाऱ्या सामाजिक,राजकीय घडामोडींवर त्यांचे सतत भाष्य असते. शेतकरी,विद्यार्थी,महिला,वंचित, शोषित यांच्या हितासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात त्या सहभागी असतात.सामाजिक,राजकीय विषयांवर वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनामध्ये त्यांची फार महत्त्वाची भूमिका असते.जिजाऊ ब्रिगेडमध्ये त्यांनी तालुकाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष आणि आता शेवटी सर्वोच्च असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय मराठा सेवा संघाचे संस्थापक अॕड. पुरुषोत्तम खेडेकर, सर्व पदाधिकारी,विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि जिजाऊ ब्रिगेडच्या लाखो महिलांना दिलेले आहे.यापुढेही आपण जिजाऊ ब्रिगेडचे कार्य वाढविण्यासाठी व शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणखी ताकदीने कार्य करू असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.