अजित पवार यांचा डबल गेम ? ; शरद पवार यांची सावध भूमिका
सुप्रिया सुळे यांना राजकीय कवचात ठेवण्याचे मोठ्या पवारांचे प्रयत्न
मुंबई / नवप्रहार वृत्तसेवा
मागील तीन दिवसात अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. राजकीय वर्तुळात याचे विविध अर्थ काढले जात आहेत. पण अजित पवार हे डबल गेम खेळत आहेत हे म्हणणे या ठिकाणी वावगे ठरू नये.
अजित दादा यांनी बंड पुकारात आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडले आहेत. त्यांनी सरकार मध्ये शामिल होऊन आपल्या आमदारांपैकी स्वतःसह 9 लोकांना मंत्रिपदाची शपथ देखील दिली आहे. काकू प्रतिभा ताई यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ते त्यांना भेटायला सिल्व्हर ओक वर सुद्धा जाऊन आले. त्यांनतर ते आपल्या नवीन मंत्र्यांसह यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी (काल) पुन्हा आपल्या 30 समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला जाऊन आलेत. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. आणि दादा आणि शरद पवार समर्थक आप आपल्या परीने अर्थ काढत असले तरी अजित पवार डबल गेम खेळत आहेत असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
राष्ट्रवादीचे 30 आमदार अजितदादांबरोबर शरद पवारांच्या भेटीला गेले. पवारांनी त्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही हे जितके खरे आहे, तितकेच अजितनिष्ठ आमदारांनीही पवारांना आम्ही माघारी फिरायला तयार आहोत असे सांगितलेले नाही, याला महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. तुम्ही आमच्यासाठी दैवत आहात. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. पण आमचा निर्णय आम्ही फिरवणार नाही हेच या आमदारांनी अजितदादांनी आणि त्यांच्याबरोबरच्या 9 मंत्र्यांनी पवारांना सांगितले. मग भले ते सांगणे अप्रत्यक्ष असेल, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही.
शरद पवारांचे हवेत फक्त आशीर्वाद
मराठी माध्यमांमध्ये दिलजमाई होणार का??, अजितदादांची शरद पवारांकडे वारंवार जाऊन मनधरणी, अशा आशयाच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या, पण जितके शरद पवार आपल्या विशिष्ट भूमिकेवर टिकून असल्याचे मराठी माध्यमे म्हणत आहेत, तितकीच ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे, ती म्हणजे अजितदादा आणि त्यांचे समर्थक यांना फक्त पवारांचा आशीर्वाद हवा आहे पण ते आपल्या मूळ भूमिकेपासून आता मागे हटायला तयार नाहीत, ही बाब निर्णायक दृष्ट्या महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या फुटीवर खरे शिक्कामोर्तब होत आहे.
पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
अजित पवारांनी सलग तीन भेटी घेऊन पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर विशेषतः विरोधकांमध्ये त्यांच्या असलेल्या भीष्म पितामह प्रतिमेवर ठळक प्रश्नचिन्ह लावलेच आहे. पण त्याच वेळी खुद्द राष्ट्रवादीतल्या शरदनिष्ठ गटांमध्ये देखील संशयाचे जाळे फेकले आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत कुठेच पिक्चर मध्ये नसलेल्या विद्या चव्हाण नावाच्या शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी शरद पवारांच्या भेटीला वारंवार येऊ नये, असे आवाहन केले आहे. शरद पवार हे अजित पवारांच्या संख्याबळापुढे झुकण्याची भीती त्यांना वाटते आहे.
शरद पवार यांचा सुप्रिया सुळे यांना राजकीय कवचात ठेवण्याचा प्रयत्न ? या गोष्टीचे पवारनिष्ठ आणि पवार विरोधक वेगवेगळे अर्थ लावत आहेत. तरी देखील एका बाबीकडे या सगळ्यांचे दुर्लक्ष होत आहे, ते म्हणजे शरद पवार आजही अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढाई अजित पवारांना थेट सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध लढू देत नाहीत. किंबहुना सुप्रिया सुळे यांना ते अजित पवारांच्या विरोधात थेट अजून मैदानात आणत नाहीत, ही अत्यंत महत्त्वाची अधोरेखित होणारी बाब आहे!!
अजित पवारांविरुद्धची सर्व लढाई डबल गेम खेळत किंवा डबल गेम खेळण्याचे आरोप सहन करत शरद पवार स्वतःवरच घेत आहेत. सुप्रिया सुळे यांना ते अजूनही राजकीय कवचातच ठेवत आहेत. कारण सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशी लढाई राष्ट्रवादीच्या रणमैदानात झाली, तर ती पूर्णपणे विषम लढाई सुप्रिया सुळे हरतील आणि अजितदादा कायमचे जिंकतील ही भीती पवारांना वाटते आहे. म्हणूनच अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही थेट लढाई टाळण्यासाठीच पवार स्वतःवर विश्वासघाताचे – विश्वासार्हतेचे आरोप सहन करून राष्ट्रवादीतील लढाई आपल्या अंगावर घेऊन लढत आहेत.